File image of rains in Mumbai | (Photo Credits: PTI)

थोड्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने (Rain)  पुन्हा आपला जोर दाखवायला सुरुवात केली आहे. केंद्रीय हवामान विभागाने (Weather department) रविवारी आणि सोमवारी मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत गेल्या अनेक तासांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींच्या सामना करावा लागत आहे. सध्या रेल्वे (Local Railway) सेवा सुरळीत चालत असल्यामुळे रेल्वेतू प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबईत सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच हवामान विभागाकडून रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती देताना असे म्हटले आहे की, 'मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.' हवामान विभागाने या दरम्यान ढगाळ हवामान राहील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने मागील २४ तासात ७० मिमी पावसाची नोंद केली आहे.

हे देखील वाचा-मुंबई पोलिसांचे नागरिकांना सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन; आपत्कालीन परिस्थितीत 'या' नंबरवर साधा संपर्क

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकण किनारपट्टी या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. ज्यामुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागले होते. तर हजारो जणांचे संसार उद्धवस्त झाले होते.