मुंबई पोलिसांचे नागरिकांना सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन; आपत्कालीन परिस्थितीत 'या' नंबरवर साधा संपर्क
Mumbai Rains | Representational Image (Photo Credits: PTI)

गेला आठवडाभर महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथावर तर सतत पावसाची रिपरिप चालू आहे. कोकणासह, ठाणे, पालघर आणि मुंबई या ठिकाणीही पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यात गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2019) दिवस चालू आहेत, आज काही ठिकाणच्या गौरी गणपतींचे विसर्जन आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये मुंबई पोलीस म्हणतात, ‘प्रिय मुंबईकरांनो, कृपया सद्य हवामान स्थिती लक्षात घेऊन आज बाहेर पडा आणि बाहेर पडतानाही काळजी घ्या. भाविकांनी गणपती विसर्जनादरम्यान विसर्जन ठिकाणीही अत्यंत काळजी घ्या. सध्या पावसाचे दिवस आहेत सावधगिरी बाळगायला पाहिजे. सुरक्षित रहा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी 100 नंबरवर कॉल करा किंवा आमच्याशी संपर्क साधा.’

(हेही वाचा: Mumbai Monsoon Forecast 2019: मुंबईमध्ये पुढील 24 तास मध्यम ते मुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज)

अशाप्रकारे मुंबई पोलीसही नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज झाले आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यात गणपतीच्या विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. हीच गोष्ट ओळखून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई मध्ये एका दिवसाच्या मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन लोकल बंद पडते, रहदारी वाढते, त्यात रस्त्यावरही पाण्याची पातळी वाढते. या सर्वांचा विचार करूनच, गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा.