BEST Bus (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) सुमारे 900 बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगच्या (BEST) कंत्राटी बस चालकांना 5 महिन्यांचा पगार आणि 13 महिन्यांपासून भविष्य निर्वाह निधी (PF) दिला गेला नाही. या चालकांनी याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की त्यांच्या कंत्राटदारांनी त्यांना पगार दिला नाही. या चालकांचे मूळ वेतन दरमहा 18 हजार रुपये आहे.

एका ड्रायव्हरने स्पष्ट केले की, त्यांच्या पगारातून पीएफ आणि वैद्यकीय खर्चाच्या नावावर पैसे कापले होते पण ते अद्याप त्यांना दिले गेले नाहीत. दुसर्‍या ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार ते 2019 पासून काम करत आहेत, महामारीच्या काळातही ते कर्तव्यावर होते. परंतु त्यांना बोनस आणि त्यांच्या हक्काचा पगारही मिळाला नाही.

चालकांनी पुढे असा दावा केला की, त्यांना या संदर्भात कोणत्याही सरकारी संस्था किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांनी प्रत्येक कार्यालयाशी संपर्क साधला, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. चालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यापैकी निम्मे लोक भाड्याच्या खोल्यांमध्ये (चाळी) राहतात आणि आता त्यांच्याकडे भाडे द्यायला किंवा कुटुंबासाठी अन्नधान्य विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत.

या परिस्थितीमुळे नैराश्य आलेल्या चालकांपैकी एका चालकाने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. हा चालक मराठवाड्यातील होता आणि अनेक महिने पगार न मिळाल्याने त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यासह सध्या पाच बस डेपोमध्ये 280 बसेस चालवायला चालक नसल्याने या बसेस अशाच पडून आहेत. चालकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही मदतीसाठी पत्र लिहिले आहे परंतु अद्याप त्यावर उत्तर मिळाले नाही. (हेही वाचा: बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी च्या वेळा, तिकीट दर इथे घ्या जाणून)

हा खासगी कंत्राटदारांशी संबंधित विषय असल्याने बेस्टचे अधिकारीही त्यात हस्तक्षेप करत नाहीत, असा चालकांचा दावा आहे. दरम्यान, कुलाबा पोलिसांनी सांगितले की, मुलुंड येथील एमपी ग्राऊंड या कंत्राटदाराच्या मुख्य कार्यालयाला काही महिन्यांपासून कुलूप आहे आणि या मालकाबद्दल कोणतीही माहिती नाही. आता त्यांनी याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की, चालकांकडून माहिती घेतल्यानंतर हे गुन्हेगारी प्रकरण आहे की दिवाणी प्रकरण आहे हे ठरवले जाईल. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणताही एफआयआर किंवा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, परंतु पुढील तपासासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे.