मुंबई: चेंबूर येथे 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; 7 जणांना अटक
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) मधील चेंबुर (Chembur) येथे एका 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी हत्या आहे. प्रशांत पानवलकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य दोन आरोपी प्रशांतच्या होणाऱ्या पत्नीचा लैंगिक छळ करत असल्याने दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

एक दिवस अचानक प्रशांतच्या घरात घुसून आरोपीने त्याच्यावर चॉपर, तलवार आणि क्रिकेट बॅटने वार करायला सुरुवात केली. त्या दरम्यान घरातील सदस्य तिथेच उपस्थित होते. मात्र अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वजण सून्न झाले. प्रशांतच्या दोन भावांनी यात पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात प्रशांतचा मृत्यू झाला असून त्याचे दोन भाऊ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (गुरुग्राम मधील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; Bois Locker Room Chat ग्रुपशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय)

यापूर्वी दोन कुटुंबामध्ये गाडी पार्किंगवरुन झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याची घटना मुंबईतून समोर आली होती. दोन भावांवर प्राणघातक हल्ला करुन 16 वर्षीय भावंडाला जखमी करण्यात आले होते. त्यापैकी एका भावाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जखमी भावंडांवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील 19 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याने त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटला आहे.