वैद्यकीय पदवी नसतानाही डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्यांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात गोवंडी (Govandi) मधून 5 बोगस डॉक्टरांना (Bogus Doctor) अटक करण्यात आली आहे. बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष 6 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. (Nagpur: नागपूर येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक; बारावी पास केळीवाला कसा बनला डॉक्टर, घ्या जाणून)
त्यानंतर बैगनवाडी परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत, क्षमा या नावाने क्लिनिक चालवणाऱ्या 5 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. अधिकृत वैद्यकीय परवाना आणि महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांवर उपचार करत होते. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बोगस डॉक्टर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यासाठी त्यांनी महानगर पालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची मदत घेतली.
या बोगस डॉक्टरांकडून स्टेथोस्कोप, वेगवेगळ्या प्रकराचे इंजेक्शन, अॅंटीबायोटीक टॅबलेट्स, सर्जिकल स्ट्रे, सलायन बॉटल्स असे विविध प्रकारची औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहेत. तसंच यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झोपडपट्टीतील अशिक्षित गरीब व्यक्तींवर यात लक्ष्य केले जात होते. सुरुवातील कमी पैशात उपचार करुन नंतर हळूहळू फी वाढवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता. त्यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचा इशारा गुन्हे शाखेने नागरिकांना दिला आहे.