Nagpur: नागपूर येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक; बारावी पास केळीवाला कसा बनला डॉक्टर, घ्या जाणून
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या संपूर्ण भारत कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच भितीचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटक नागरिकांची फसवणूक करत असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच नागपूर (Nagpur) येथे संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूरच्या कामठी (Kamptee) परिसरामध्ये बारावी पास असलेल्या एका फळ विक्रेत्याने इंटरनेटवरून डॉक्टरकी शोधून रुग्णालय थाटले. एवढेच नव्हेतर, कोरोनाबाधित रुग्णांवरही त्याने उपचार केल्याचे समजत आहे. मात्र, संपूर्ण प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, चंदन चौधरी असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. चंदन हा मूळचा बिहारचा असून गेल्या काही महिन्यांपासून तो नागपूरमध्येच आहे. त्याने नागपूरमध्ये आल्यानंतर सुरुवातीला केळी विक्रेता म्हणून काम केले. परंतु, त्यानंतर बारावी पास असलेल्या चंदनने इंटरनेट वरून डॉक्टरकी शोधली आणि बोगस डिग्री बनवून धर्मार्थ नावाने रुग्णालय थाटले. रुग्णालय थाटल्यानंतर यूट्यूब आणि इंटरनेटच्या माध्यमातून चंदन हा रुग्णाला इंजेक्शन देणे, सलाईन देणे व औषध उपचार देणे शिकला. एवढेच नव्हेतर, त्याने कोरोना रुग्णांवरही उपचार केले. परंतु, चंदन बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळताच नवीन कामाठी पोलिसांनी रुग्णालयात धाड टाकून त्याला अटक केली आहे. हे देखील वाचा- लॉकडाऊन मध्ये कारणाशिवाय 'No Bhagam Bhag'; मुंबई पोलिसांचा सल्ला

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यातच नागपूर येथील बोगस डॉक्टरचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी बोगस डॉक्टरला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करत आहेत.