पालघर (Palghar) जिल्ह्यातील वनगाव (Vangaon) येथे एका 24 वर्षीय तरुणाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून भाड्याच्या घरात फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल मिश्रा असे या तरुणाचे नाव असून तो भाड्याच्या घरात रुममेट सोबत राहत होता. त्यांच्यासोबत मद्य पार्टी करत असताना त्यांनी राहुलचे न्युड फोटोज काढले होते. त्यावरुन ते सातत्याने त्याला ब्लॅकमेल करत होते. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून राहुलने हे टोकाचे पाऊल उचलले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, वनगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राहुलच्या घरातून सुसाईट नोट मिळाली नाही. मात्र पोलिसांनी मित्रांची चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल फोनमध्ये राहूलचे न्युड फोटोज सापडले.
राहुल मिश्रा आपल्या दोन रुममेटसह भोईसरच्या एमआयडीसीमधील एका औषधं कंपनीत काम करत होता. सुरुवातीला दोन्ही मित्र न्युड फोटोवरुन मस्करी करत असल्याचे राहुलला वाटले. मात्र त्यानंतर ते पैशांसाठी राहुलला ब्लॅकमेल करु लागले. पैसे न दिल्यास न्युड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली.
पोलिसांनी राहुलच्या दोन्ही रुममेटचे मोबाईल फोन्स जप्त केले आहेत. फोनमध्ये ते फोटोज डिलीट करण्याची विनवणी करणारा राहुलचा मेसेजही आहे. राहुलच्या शवविच्छेदन रिपोर्ट्सनंतर या प्रकरणाला अधिक स्पष्टता येईल.