Instagram (Photo Credits-File Image)

मुंबईच्या (Mumbai) ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी जोगेश्वरी (पश्चिम) येथील एका 27 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा लैंगिक छळ करण्यासाठी इंस्टाग्रामवर तब्बल अकरा बनावट प्रोफाइल तयार केल्या होत्या. याच प्रकरणी त्याला अटक केली आहे. या पत्नीने गेल्या वर्षी तिला तिहेरी तलाक दिल्याबद्दल पतीविरोधात एफआयआर दाखल केला होता. याच रागातून पती तिचा फेक प्रोफाईलद्वारे छळ करत होता.

30 वर्षीय तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, ती तिचे आई-वडील आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत राहते. तिचे तीन इंस्टाग्राम प्रोफाइल आहेत, एक स्वतःचा, एक तिच्या तीन वर्षांच्या मुलीचा आणि एक तिने तिच्या स्वयंपाकाच्या व्हिडिओसाठी सुरु केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये, तक्रारदाराला अज्ञात इंस्टाग्राम अकाउंटवरून काही मेसेजेस येऊ लागले. सुरुवातीला तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण हळूहळू त्यामध्ये शिवीगाळ करणारे मेसेजेस वाढू लागले. त्यानंतर तिने आपल्या मुलीचे इंस्टाग्राम खाते तपासले आणि तिथेही अनेक खात्यांवरून असेच अपमानास्पद मेसेजेस आल्याचे आढळले.

आपल्याला एकूण 11 इंस्टाग्राम प्रोफाईलवरून अश्लील तसेच शिवीगाळ करणारे मेसेजेस आल्याचे तिने सांगितले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, तिने ओशिवरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून याबाबत तक्रार दाखल केली. याठिकाणी पतीवर आयपीसीच्या कलम 500, 501, 504, 506, 509 आणि आयटी कायद्याच्या 66C अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले. तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला, जो तक्रारदाराचा नवरा होता. (हेही वाचा: Crime Patrol: पुणे येथे क्राइम पेट्रोल पाहून प्रेयसीचा खून; पैशाच्या वादातून प्रियकराचे कृत्य)

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तक्रारदाराला 2021 मध्ये तिहेरी तलाक दिला होता, त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा, 2019 अंतर्गत त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. यावरूनच संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचा छळ सुरू केला होता. याबाबत जेव्हा आरोपीला न्यायालयामध्ये उभे केले गेले, तेव्हा गुन्हा जामीनपात्र असल्याने मंगळवारी अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. तसेच त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचेही कोणते न्याय्य कारण नव्हते.