मान्सून ऑफरमध्ये अनेक आकर्षक सेल असतात. त्यापैकी एक म्हणजे उल्हासनगर मधील '10 रूपयात साडी'. परंतू या सेलमध्ये ग्राहकांची झालेली तोबा गर्दी हाताबाहेर गेल्याने स्थानिक पोलिसांना शनिवार (8जून) दिवशी हा सेल स्थगित करावा लागला. उल्हासनगरमध्ये गजानन मार्केटमध्ये 'रंग क्रिएशन्स' दुकानाचा मालक अश्विन साखरे 90 रूपयात तयार होणारी साडी अवघी 10 रूपयांत विक्रीसाठी ठेवली होती.
टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना, अश्विन साखरे यांनी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 'वर्षभर व्यवसायामधून फायदा होतो पण त्यामधूनच सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्याचा एक भाग म्हणून 90 रूपते उत्पादन खर्च असणार्या साड्या सेलमध्ये अवघ्या 10 रूपयांमध्ये विक्रीला ठेवल्या आहेत.चार दिवसात या ऑफरमध्ये 2000 हून अधिक साड्या विकल्या गेल्या आहेत.
5 जूनला उल्हासनगरमध्ये या सेलला सुरूवात झाली.बघता बघता ही ऑफर इतकी प्रसिद्ध झाली की ग्राहकांची दुकानाबाहेर गर्दी वाढायला लागली. लांबच लांब रांगा झाल्या आणि यामधूनच ग्राहकांमध्ये भांडणंदेखील वाढली. हाताबाहेर जाणारी गर्दी पाहून पोलिसांनी दुकानमालकाला दुकान बंद करून हा सेल स्थगित करण्यास भाग पाडलं.