Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत. त्यानुसार आता 31 ऑगस्ट पर्यंत योजनेसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केला तरीही महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना 1 जुलै, 2024 पासून दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येईल. या योजनेबाबत राज्य सरकारने 7 महत्वपूर्ण बदल केले आहेत.
लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4.जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेसाठी पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 65 वर्ष करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
पहा पोस्ट-
महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ७ महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.#MonsoonSession2024 #MajhiLadkiBahinYojana #Maharashtra pic.twitter.com/lA2T3JH64F
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 4, 2024
यासह अडीच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी महिलांना कोठेही अर्ज घेऊन जाण्याची गरज नाही. ‘नारी शक्ती दूत’ ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, त्याद्वारे नाव नोंदणी करता येणार आहे. (हेही वाचा: Palghar Absconding Accused Arrested: पालघरमध्ये घरे देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अटक)
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.