MSRTC Strike Called Off: एसटी संप संघटनेकडून मागे, कर्मचारी संपावर ठाम; कारवाई मागे घेण्याबाबत महामंडळाकडून आश्वासन
MSRTC Employees | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एसटी कर्मचारी संप संघटनेकडून मागे (MSRTC Strike Called Off) घेण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटणार की कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे. एसटी संघटनेने संप (MSRTC Strike) मागे घेतल्याने संघटनेतील कर्मचारी कामावर परततील. त्यामुळे प्रदीर्घ काळ ठप्प असलेले राज्य परीवहन (MSRTC) मंडळाची बस सेवा पुन्हा सुरु होईल अशी आशा आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारही एक पाऊल मागे येताना दिसत आहे. कर्मचारी कामावर परतल्यास संप काळात त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे ताण काहीसा निवळून कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात सोमवारी पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेर त्याबाबत आपल्याला काहीच चर्चा करता येणार नाही. शिवाय तसे केले तर ते न्यायालयाचा अनादर केल्यासारखे होईल, असे दोन्ही बाजूंच्या लक्षात आले. शिवाय विलीनीकरणाच्या मागणीसाठी नेमलेली त्रिसदस्य समिती जो निर्णय देईल तो एसटी महामंडळ व एसटी संघटना अशा दोन्ही बाजूंनी मान्य करण्याचे बैठकीत निश्चित झाले. या बैठकीनंतर संप मागे घेतला जात आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी केली. जयकुमार गुजर यांनी सोमवारी (20 डिसेंबर) रात्री संप मागे घेतल्याची घोषणा केली. (हेही वाचा, MSRTC Strike: एसटी कर्मचारी संप, राज्य सरकार आक्रमक; मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा)

संप मागे घेतल्याने कर्मचारी कामावर परततील. तसेच, सेवा पूर्ववत होईल, अशी राज्य सरकारला आशा आहे. दरम्यान, संघटनेने संप मागे घेतला असला तरी, आझाद मैदानात आंदोलनास बसलेले कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण संपातून माघार घेणार नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.