प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

दीड वर्ष कोरोना संकट आणि नंतर कर्मचार्‍यांचा संप यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी आता एसटी जो पर्यंत नफ्यामध्ये येत नाही तो पर्यंत नोकरभरती न करण्याचा निर्णय एसटी मंडळाने (MSRTC) जाहीर केला आहे. सध्या प्रतिक्षा यादीमध्ये असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार नाही. असे सांगण्यात आले आहे. एसटी विलीनीकरणा बाबत नुकत्याच सादर झालेल्या तीन सदस्य समिती अहवालातही महामंडळात नवीन नोकरभरतीवर निर्बंध आणण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

एसटी ला 2020-21 मध्ये 4138 कोटी उत्पन्न मिळाले होते. तर खर्च 5866 कोटी झाला होता. यामध्ये संचित तोटा 7099 कोटी रूपये झाला आहे. 2021-22 मध्ये 6890 उत्पन्न असून 10198 खर्च झाला आहे. त्यामुळे तोटादेखील वाढ होत राहिल्याने एसटीचं आर्थिक गणित ढासळलं आहे. यामध्ये कोरोना संकटात एसटी ठप्प राहिल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान एसटी कर्मचार्‍यांचे पगार देखील वेळेवर देण्यासाठी महामंडळाला राज्य सरकारकडून मदत घ्यावी लागली आहे. त्यांच्या कडून मिळणार्‍या निधीवरच एसटीचा कारभार सुरू आहे.

एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवर 3 सदस्यांच्या समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे. यामध्ये महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आणि खर्चात कपात करण्यासाठी नियोजन सादर केलेले आहे. नव्या बस खरेदी करताना देखील CNG बस घेणं, भाडेतत्त्वावर नवीन बस घेणे अशा सूचना केल्या आहेत.

मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. 87 पैकी 61 हजार कर्मचारी संपात आहेत. एसटी चालू ठेवण्यासाठी सध्या 400 खाजगी चालकांची भरती झाली आहे.