MPSC ची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला; राज्य सरकार कडून माहिती
MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group-B Exam Date: कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षात शैक्षणिक वर्षाचे देखील तीन तेरा वाजले आहे. महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे शालेय अभ्यासक्रमासोबतच अनेक स्पर्धा परीक्षांचे देखील वेळापत्रक गडबडले आहे. कोरोना संकट आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामध्ये मागील दीड वर्षांपासून रेंगाळत असलेल्या परीक्षा पाहून विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. आता राज्य सरकारने यामधील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group-B) ही 4 सप्टेंबर 2021 ला होणार असल्याचं जाहीर केले आहे. त्याबाबतचं परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. MPSC मार्फत राज्यात लवकरच होणार 15, 511 पदांची भरतीप्रक्रिया; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही परीक्षा यापूर्वी 11 एप्रिलला होणार होती पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आता कोरोना निर्बंधांमधून शिथिलता देखील देण्यात आल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन. 

महाराष्ट्रात एमपीएससीच्या परीक्षांसोबतच भरती प्रक्रियेचा देखील गोंधळ सुरू आहे. मुलाखती न झाल्याने, निवड झाली पण पोस्टिंग नाही यामुळे अनेक तरूण मागील कित्येक महिने घरातच बसून राहिले आहेत. यामुळे वय उलटून जात असल्याने, आर्थिक चणचण असल्याने सरकार एमपीएससी बाबत लवकरात लवकर कधी भूमिका घेणार असा प्रश्न तरूण विचारत आहेत. यामध्ये एकाने आत्महत्या देखील केल्याची घटना पुण्यात घडली आहे.