मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे MPSC राज्यसेवेची पुर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परीक्षा पुढे ढकलली नाहीतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील मराठी क्रांती मोर्चाने दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. मराठा समाजातील उमेदवारांचा नेमकी कोणत्या प्रवर्गात समावेश केला जाणार, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे 11 ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवेची पुर्वपरीक्षा रद्द करण्यात यावी. परीक्षा रद्द न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारादेखील मराठा क्रांती मोर्चाकडून पत्राद्वारे देण्यात आला आहे. (हेही वाचा - Maratha reservation: मराठा समाजाचा केंद्र सरकारला इशारा; आरक्षण प्रश्नावर राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन)
मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राज्यसेवेच्या परीक्षेसाठी अर्ज भरताना मराठा उमेदवारांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज भरले होते. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नेमक्या कुठल्या प्रवर्गात मराठी विद्यार्थी मोडणार याची अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि त्यांनतर परीक्षा घेण्यात याव्यात.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी सरकारकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान, मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची मागणी जोर धरू लावली आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.