कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करताना राज्य सरकार, डॉक्टर्स, पोलीस, इतर कर्मचारी, नेते, मंत्री असे अनेकजण महत्वाची भूमिका पार पडत आहेत. कोणी पैशांच्या रुपात, कुणी अन्नाच्या रुपात तर कुणी इतर प्रकारे मदत करत आहे. अशात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी आपले घर ‘गृह अलगीकरण’ (Home Quarantine) म्हणून वापरण्यास दिले आहे. याची सुरुवात कोरोना अहवाल नकारात्मक आल्यावर, कराड येथून रुकडीत परतणाऱ्या एका विद्यार्थ्याला माने यांनी स्वत:चे घर देवून केली आहे. अशाप्रकारे त्यांनी ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली.
प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चे घर देणारे देशातील ते पहिले खासदार असतील. रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नचा विचार दोन दिवसापूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर, त्याची त्यांच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे ही त्यांची संकल्पना होती. ही संकल्पना त्यांनी आज सत्यात उतरवली. (हेही वाचा: Coronavirus: अशोक सराफ व निवेदिता जोशी यांनी खास आमरस-पुरी खाऊ घालून मानले पोलिसांचे आभार)
रुकडी येथील खासदार श्री. माने यांच्या घराच्या दरवाज्यावर ‘आपुलकी गृह’ चा फलक लावण्यात आला आहे. रुकडीचे सरपंच रफिक कलावंत या विषयी म्हणाले, आपुलकी गृह ही संकल्पना खासदार श्री. माने यांनी स्वत:पासून सुरु करुन, इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. निश्चितपणे ही संकल्पना गावांमध्ये वाढीस लागेल. याबाबत धैर्यशील माने म्हणाले, ‘माझी सामाजिक जबाबदारी म्हणून माझे स्वत:चे घर आपुलकी गृह या संकल्पनेला दिले आहे. गावा-गावांमध्ये अशी आपुलकीची गृह निर्माण व्हावीत. शासनावर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या ताणामुळे काही कमतरता राहण्याची शक्यता आहे. गावामध्ये येणारे आपलेच नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी गावागावाने पुढे यावे आणि आपुलकीच्या ओलाव्याचा आधार द्यावा. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे.’