गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad) येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, मोटेरा क्रिकेट स्टेडियम (Motera Stadium) बांधले गेले आहे. आज त्याचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) करण्यात आले. या नव्या स्टेडियमचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते. यानंतर विरोधकांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचाही समावेश आहे. एका ट्वीटद्वारे आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.
जितेंद्र आव्हाढ म्हणाले आहेत, ‘स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले... हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते.’
स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले...
हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2021
दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुजरातमध्ये दाखल झालेले राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या पत्नीसमवेत सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचे भूमिपूजन केले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटेरा स्टेडियममध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत संयुक्त कार्यक्रमांना संबोधित केले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमधील नव्याने बांधलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. हा डे-नाइट टेस्ट सामना असेल. नवीन स्टेडियम बनल्यानंतर हा पहिला कसोटी सामना खेळला जाईल. दरम्यान, अहमदाबाद मधील हे स्टेडियम 63 एकरांवर पसरलेले आहे. या स्टेडियमची अंदाजित किंमत 800 कोटी आहे.