Monsoon Update by IMD: महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळसह देशातील कोणत्या राज्यात कधी पोहोचेल मान्सून? तारखेसह घ्या जाणून
Monsoon | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

तापदायक उन्हाळ्यापासून सुटका करण्यासाठी मान्सून (Monsoon 2022) लवकरच हजेरी लावत आहे. सध्या अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेला मान्सून अल्पावधीतच महाराष्ट्रात (Monsoon In Maharashtra) हजेरी लावेल. महाराष्ट्रात पाऊस येत्या 10 जूनला दाखल होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढे तो दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर भारतासह आणि इतर राज्यांमध्येहीदाखल होईल. कोणत्या राज्यात मान्सून कधी दाखल होईल याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. हवामान विभागाची माहिती म्हणजे एक प्रकारचा अंदाज असला तरी तो अंदाजही हवामान विभागाने वेळापत्रकासारखाच वर्तवला आहे.

हवामान विभागाने मान्सून संदर्भात एक नकाशाच जारी केला आहे. त्याद्वारे हवामान विभागाने म्हटले आहेकी, 16 मे रोजीच मान्सून अंदमानमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर एक जून रोजी तो लक्षद्वीपला धडक देईल. पुढे 10 जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल होईल. तर त्यानंतर पुढे तो 15 जूनला मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि इतर राज्यांमध्ये पोहोचेल. (हेही वाचा, Monsoon Rain 2022: कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांवर फेणी, मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रात पर्जन्यवृष्टीचा इशारा)

कोणत्या राज्यात कधी पोहोचणार मान्सून?

  • 26 मे- बंगालची खाडी
  • 27 मे ते 1 जून- केरळ, लक्षद्वीप, पुड्डुचेरी आणि तामिळनाडू
  • 05 जून- कर्नाटक असम मेघालय
  • 06 ते 10 जून- महाराष्ट्र, तेलंगना, सिक्कीम
  • 11ते 15 जून- छत्तीसगढ, बिहार झारखंड
  • 16 ते 20 जून- पूर्व उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड
  • 21 ते 25 जून- पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, प्रामुख्याने केरळमध्ये मान्सून एक जूनला पोहोचेल. दरम्यान, एक दिलासादायक वृत्त असे की, इथे मान्सून तीन ते पाच दिवस आगोदर दाखल होऊ शकतो. म्हणजेच 27 मे ते एक जून या काळात इथे पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.