Monsoon 2020 Updates: महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका कमी झाल्यानंतर आता देशात साऊथ वेस्ट मान्सून (Southwest Monsoon) सक्रीय होण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. यंदा भारतीय हवामान खात्याने ( Indian Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार, 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, पॉन्डिचेरीमध्ये त्याचा प्रभाव पहायला मिळाला. दरम्यान IMD ने जारी केलेल्या नव्या हवामान अंदाज 2020 प्रमाणे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र,कोकण,गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या उर्वरित भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण आहे. IMD Monsoon 2020 Forecast: यंदा भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज.
भारतामध्ये देशभर कसा सक्रिय होऊ शकतो मान्सून 2020?
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, साऊथवेस्ट मान्सून मुंबई सह महाराष्ट्राच्या अन्य भागात 10 ते 15 जून दरम्यान बरसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील 48 तासात देशातील सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ प्रांताचादेखील समावेश आहे.
येत्या मान्सून हंगामात भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस पडणार आहे. भारतामध्ये जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ आहे. या काळात भारतात अंदाजे 70% पाऊस होतो. यंदा या सरासरीच्या 96 ते 100% पाऊस बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजात देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.