Monsoon Assembly Session: एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी, आदित्य ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया
Aaditya Thackeray (PC - ANI)

राज्यविधिमंडळ अधिवेशनाचा (Monsoon Session 2022) आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सत्ताधारी आमदार आज विरोधकांविरोधात आक्रमक झालेले दिसले. आजवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होतात. पण, सत्ताधारीच विरोधकांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सत्ताधारी एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आमदारांनी विरोधकांविरोधात विधानसभेबाहेर आज जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटांच्या आमदाराचे लक्ष्य हे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) होते. आदित्य ठाकरे यांच्या विरोधता फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी या आमदारांनी केली. दरम्यान, सत्ताधारी आमदारांच्या या कृतीबद्दल आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदरांनी अनेकदा स्पष्ट केले होते की, काही झाले तरी आम्ही मतोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांबद्दल बोलणार नाही. मात्र, पाठिमागील दोन दिवस पाहता शिंदे गटातील आमदार आदित्य ठाकरे आणि मातोश्रीबद्दल जाहीर भूमिका घेताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याचे पाहायला मिळाले. ''पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर आणि दोन MLC चे लागते कुशन'', ''खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार", ''युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली'' अशा घोषणा त्यांनी दिल्या. या सर्व प्रकारामुळे आगामी काळात संघर्ष अधिक वाढेल अशी चिन्हे आहेत. (हेही वाचा, Osmanabad News: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात रुग्णालयाच्या बाथरुममध्ये महिलेची प्रसुती)

दरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या घोषणेबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये गेल्यावर अनेकांना मंत्री व्हावेसे वाटते आहे. अनेकांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. मात्र, ते त्यांना मिळताना दिसत नाही. अशा वेळी त्यामुळे मंत्रीपद मिळावे यासाठी इंप्रेस करण्यासाठी हे सगळे उद्योग सुरु असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.