Kirit Somaiya | (Photo Credit: kiritsomaiya.com)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्याशी संबंधित श्रीजी होम्स (Shreeji Homes) या कंपनीने 29.62 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शुक्रवारी केला. वांद्रे येथे श्रीजी होम्सचे कार्यालय असून त्यांनी शिवाजी पार्क परिसरात इमारत बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. फर्मकडे 5.86 कोटी आणि 23.75 कोटी रुपयांच्या दोन नोंदी आहेत. काळा पैसा लपवण्यासाठी कंपनीचा वापर केला गेला, असे सोमय्या यांनी सांगितले.

श्री जी होम्स कंपनीद्वारे मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे. या कोट्यवधींच्या प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती, अशा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे व मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री जी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. आज ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पाटणकर यांच्यासह मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधात आपण अंमलबजावणी संचालनालय (ED)आणि दिल्ली आणि मुंबईतील आयकर कार्यालयांकडे तक्रार केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. अशाच अन्य एका प्रकरणात आरोपी असलेला चतुर्वेदी सध्या फरार आहे. (हेही वाचा: किरीट सोमय्या अँड फॅमिलीचा विक्रांत नंतर आता 'टॅायलेट घोटाळा' बाहेर काढणार; संजय राऊत यांचा इशारा)

किरीट सोमय्या यांनी काल आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे नवे आरोप केले. दुसरीकडे, आज संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून किरीट सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे. या घोटाळयामध्ये 100 कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप आहे.