पंढरपूर: विठुरायाच्या मंदिरात आजपासून मोबाईलवर बंदी; समितीने केली स्वतंत्र लॉकरची व्यवस्था
Pandharpur Vitthal Mandir (Photo Credits: Facebook)

नवीन वर्षाची सुरुवात अतिशय मंगलमयी आणि धार्मिकरित्या व्हावी यासाठी अनेक भाविक दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. यंदाही असंख्य भाविक पंढरपूरात (Pandharpur) विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात दर्शनासाठी आले आहे. यासाठी मंदिर समितीने मंदिराच्या गाभा-यात विशेष ब्लू डायमंड नावाच्या फुलांची आरास देखील केली आहे. या फुलांमुळे विठूरायाच भोळं-भाबडं रुप आणखीनच गोंडस दिसत आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिर व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आता या मंदिराच्या समितीने आजपासून (1 जानेवारी 2020) पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. याकरिता समितीने मंदिरात स्वतंत्र लॉकरची व्यवस्थाही केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्याचे कारणही तसेच आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भक्त मंदिरात आल्यावर फोटो काढणे, सेल्फी काढणे तसेच मोबाईलवर बोलणे यांसारख्या गोष्टी करतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत जाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यासाठी म्हणून गाभा-यात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आजपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे 600 लॉकरची व्यवस्था केली आहे. यासाठी प्रत्येकी 2 रुपये आकारले जातील.

हेदेखील वाचा- पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आता 24 तास भाविकांसाठी खुले राहणार, दर्शन देताना विठ्ठल-रुक्मिणीला थकवा येऊ नये म्हणून केली ही विशेष तयारी

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता पर्यटनस्थ ऐवजी तीर्थक्षेत्र या ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे. पंढरपूर येथे या वर्षी देखील भाविकांची गर्दी दिसून आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदिर समितीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली. ब्ल्यू डायमंड या फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा,सोळखांबी,प्रवेशद्वार आदी ठिकाणी आकर्षक फुलांनी सजविले आहे. या फुलांच्या आरासित देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

विठूमाऊलीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करुन आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. तसेच जर कोणी मोबाईल मंदिरात आणला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.