आई-बहिणीवरुन शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा; मनसे आमदार राजू पाटील यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Anil Deshmukh & Raju Patil (Photo Credits: Twitter)

वसई येथे एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या परिवहन सेवेच्या उद्धाटन कार्यक्रमात मनसैनिकांनी गोंधळ घातला. घोषणाबाजी करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या दरम्यान पोलिसांनी विनाकारण हात उचलला असून आई-बहीणीवरुन शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. त्यांच्या निलंबनाची मागणी देखील जोर धरु लागली आहे. यापूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी निलंबनाची मागणी केली होती. आता मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी यासंदर्भात थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आम्हाला असलेला सार्थ अभिमान व विश्वास हा कायम टिकविणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे, असंही म्हटलं आहे.

पत्रात राजू पाटील यांनी लिहिले की, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मनसे गेले 6 महिने रितसर पत्र व्यवहाराने आयुक्तांची भेट मागत होते. परंतु, आयुक्तांकडून वेळ देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे 5 जानेवारी रोजी पालिका परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात कार्यकर्त्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी केली.

पुढे ते म्हणाले की, आंदोलनं हाताळण्याची एक पद्धत आणि नियम आहेत. परंतु, वसई-विरारमध्ये घडलेला प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या किंवा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत घडणे योग्य नाही. पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन गृह खात्याला शोभा देत नसून ते अत्यंत घृणास्पद आहे. त्यांनी शिवीगाळ केलेली ध्वनीफित सोशल मीडियावर फिरत आहे.

Raju Patil Tweet:

आंदोलनकर्त्यांना कार्यक्रम संपेपर्यंत स्थानबद्ध न करता मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होत असून पोलिस दलाची बदनामी होत आहे. त्यामुळे शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यामुळे महाराष्ट्र पोलिस दल आणि गृहखात्याबद्दल जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

यापूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाचा खरपूस समाचार घेतला होता. तसंच पोलिसांनी वर्दी काढून समोरासमोर आमच्याशी भिडा, असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं होतं. त्याचबरोबर ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलत त्याच हातांनी सलाम कराल, असं म्हणत एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.