औरंगाबाद च्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक, औरंगाबादेत चंद्रकांत खैरे यांची गाडीला अडवून मनसैनिकांनी घातला घेराव
Chandrakant Khaire (Photo Credits-Twitter)

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसे (MNS) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यात आज मनसैनिकांनी औरंगाबादेत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीला घेराव घातला. तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे या मागणीवर ठाम राहत चंद्रकांत खैरे यांच्या अनेक प्रश्नांची सरबत्ती लावली. TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणासंदर्भात खैरे यांना जाब देखील विचारला. तसेच त्यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर पत्रक फेकून जोरदार घोषणाबाजी देखील केली.

मनसे औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' ठेवण्यात यावे यावर ठाम आहे. या संदर्भात मनसेने शिवसेनेला अल्टिमेटम देखील होता. त्याचे पुढे काय याबाबत मनसैनिकांनी चंद्रकांत खैरे यांना विचारले. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.हेदेखील वाचा-

चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचं कळल्यानंतर शेकडो मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले. मनसे सैनिकांनी खैरे यांची गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यामुळे खैरे यांना गाडीच्या बाहेर यावं लागलं. यावेळी खैरे यांनी मनसे सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक मनसे सैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत औरंगाबादचं नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला.

मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खैरेंना गप्प उभं राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.