Tesla नं भारतात पहिल्या कार्यालयासाठी Bengaluru ला पसंती दिल्यानंतर 'बोलाची कढी बोलाचा भात' म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांची आदित्य  ठाकरेंवर खोचक टीका
Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार्‍या टेस्ला (Tesla) कंपनीची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क ने त्यांचं पहिलं ऑफिस बेंगळूरू (Bengaluru) मध्ये थाटलं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला भारतामध्ये येणार अशी माहिती दिल्यानंतर अनेकांना याबाबत उत्सुकता होती. दरम्यान महाराष्ट्र सरकार कडून देखील टेस्लाशी बोलणी झाली होती पण आता ऑफिस थाटताना महाराष्ट्राऐवजी त्यांनी बेंगळूरूला पसंती दिल्यानंतर मनसेने महाविकास आघाडीवर आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) खोचक टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्वीट करत आदित्य ठाकरेंच्या जुन्या ट्वीटचा फोटो शेअर करत 'टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात"' म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राजशिष्टाचार मंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा टेस्ला सोबत चर्चा झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळेस  टेस्लाला महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकीसाठी आमंत्रित करण्याबाबत बातचीत झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच टेस्लाची भारतात एंट्री ही केवळ गुंतवणूकीपुरता मर्यादीत नाही तर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि शाश्वत विकासावर विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मंत्रिमंडळाची निर्मिती आणि खाते वाटप झाल्यानंतर मनसेने त्यांची शॅडो कॅबिनेट जाहीर केली होती. महाविकास आघाडीच्या कामकाजावर मनसे कडून सातत्याने लक्ष ठेवले जाते. मागील काही दिवसांत कोविड सेंटर उभारणीत गैर व्यवहार झाल्याचं सांगत संदीप देशपांडेंनी यापूर्वी देखील वरूण सरदेसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते.

संदीप देशपांडे ट्वीट

बेंगलोरच्या सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्टच्या (CBD) लेव्हले रोडवरील एका पत्त्यावर टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे नोंदणी झाली आहे. ही नोंदणी 8 जानेवारी रोजी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर कंपनीने वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेनस्टाईन या तीन जणांची नावे संचालक म्हणून जाहीर केली आहेत. टेस्ला भारतमध्ये लक्झरी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि व्यापार करेल. यासाठी त्यांची 5 राज्यांशी बोलणी चालू आहेत. टेस्लाची भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट सुरू करण्याची तसेच संशोधन व विकास केंद्र स्थापित करण्याची योजना आहे.