![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/01/Tesla-380x214.jpg)
भारतात येणार की नाही? आली तर कधी येणार? अशा चर्चा सुरु असताना अखेर इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी टेस्लाची (Tesla) भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. इलोन मस्कच्या (Elon Musk) टेस्लाने बेंगळुरू येथे आपले कार्यालय थाटले आहे. कंपनीने भारतात नक्की काय करण्याची योजना आखली आहे हे जरी गुलदस्त्यामध्ये असले तरी, कंपनी भारतामध्ये आली आहे ही बाब समाधानकारक आहे. टीओआयने कंपनीचे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC) प्राप्त केले आहे, त्यानुसार बेंगलोरच्या सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्टच्या (CBD) लेव्हले रोडवरील एका पत्त्यावर टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे नोंदणी झाली आहे. ही नोंदणी 8 जानेवारी रोजी झाली असल्याचे दिसत आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्याच्या शेवटी सांगितले होते की, टेस्ला 2021 मध्ये मोटारींची विक्री सुरू करेल. कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी TOI ला सांगितले की, 'कंपनीने आता नोंदणी केली असली तरी ते येथे काय करतील याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही. ही पहिली स्टेप आहे आणि प्रधान सचिवांच्या नेतृत्वात आमचे अधिकारी या कंपनीशी सतत संवाद साधत आहेत. या कंपनीला सर्वोतोपरी मदत देण्यास सरकार तयार आहे.'
कंपनीने वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेनस्टाईन या तीन जणांची नावे संचालक म्हणून जाहीर केली आहेत. सार्वजनिकपणे उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार तनेजा हे मूळ कंपनीत मुख्य लेखा अधिकारी असतील. मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला भारतमध्ये लक्झरी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि व्यापार करेल. यासाठी त्यांची 5 राज्यांशी बोलणी चालू आहेत. टेस्लाची भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट सुरू करण्याची तसेच संशोधन व विकास केंद्र स्थापित करण्याची योजना आहे. (हेही वाचा: Tata ने लॉन्च केला नव्या सफारीचा टीझर, लवकरच बाजारात उतरवली जाणार ही आयकॉनिक एसयुवी)
दरम्यान, टेस्ला तीन सेडान मॉडेल वाहनांसह भारताच्या बाजारात प्रवेश करू शकते. या गाड्यांची किंमत सुमारे 60 लाख रुपयांपर्यंत असू शकते. एकदा चार्ज केल्यावर या गाड्या 500 किमीपर्यंत जाऊ शकतील. या गाड्यांची उच्च गती 250 किमी/ ताशी असू शकते.