ठाणे: वाढीव वीजबिलाविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार, अविनाश जाधव यांनी दिला इशारा
Avinash Jadhav (Photo Credits: Facebook)

संपूर्ण राज्यात सध्या वीजबिल (Electricity Bill) वाढीची मोठी समस्या सामान्य जनतेला भेडसावत आहे. यामुळे लोकही प्रचंड त्रस्त झाले असून महावितरणाकडून ठोस पावले उतरली जात नसल्याने नागरिक चिंतेत आहे. अशातच आता वाढीव वीजबिलं लवकरात लवकर कमी करावी अन्यथा मनसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिला आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी लवकरच वीजबिलवाढीची समस्या मार्गी लावावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरुन शक्तिप्रदर्शन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वीजबिल प्रश्नावरुन ठाण्यात वातावरण चांगलच तापू लागलं आहे. यात अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या परीने आंदोलन करत आहेत. त्यात आता मनसेही आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

हेदेखील वाचा- Exorbitant Electricity Bills: सामान्य नागरिकांना वाढीव वीजबिलांतून तत्काळ दिलासा द्यावा; देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारला विनंती

ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाचा आम्ही निषेध नोंदवितो. आम्हाला वाटले नागरिकांची परिस्थिती पाहून वीजबिलामध्ये दिलासा मिळेल. मात्र ऊर्जा मंत्र्यांनी नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली. याचा निषेध आम्ही रस्त्यावर उतरून करू, असा इशाराही मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान वाढीव वीजबिल वाढीविरोधात येत्या गुरुवारी मनसेची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला मनसे नेते आणि सरचिटणीस देखील उपस्थित राहणार आहेत. वाढीव वीज देयकांवर घेतलेल्या यू-टर्नवर सरकारला घेरण्यासाठी बैठकीत आंदोलनाची व्यूहरचना ठरण्याची शक्यता आहे.

वाढीव वीजबिल आलेले पाहून अनेकांना जोरदार झटका बसला आहे. तर काही लोकांनी तर आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत सर्वांनाच वीजबिल पाहून मोठा धक्का बसला आहे.