मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या (Assembly Election 2019) तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) एक मेळावा आयोजित केला आहे. सोमवारी, 30 सप्टेंबर रोजी मुंबईच्या एम.आय.जी क्लब, वांद्रे (पूर्व) येथे सकाळी 10 वा. हा मेळावा पार पडणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती देण्यात आली. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते दाखल होणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या मेळाव्याचे औचित्य साधून एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मेळाव्यात मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे हे पक्षाचे नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व 'विधानसभा 2019 निवडणूकीच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना' मार्गदर्शन करणार आहेत. यावरून मनसे मोठ्या ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र राज ठाकरे निवडणूक लढवणार का? याबाबत अजूनही संभ्रम आहे. दुसरीकडे मनसेच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोकण अशा महत्वाच्या ठिकाणच्या उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: Kohinoor Mill Case: कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही; राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर दिली पहिली प्रतिक्रिया)

लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी भाजपविरोधी प्रचार मोहीम उघडली होती. राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा आयोजित करून भाजपची पोलखोल केली होती. आता विधानसभेच्या निवडणुकीवेळी राज ठाकरे कोणती भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेच्या 100 उमेदवारांची यादी तयार असल्याची बातमी मिळाली होता, मात्र राज ठाकरे यांनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. या मेळाव्यामध्ये या बाबतीत घोषणा होण्याची शक्यता आहे.