राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीबाबत मनसे कार्यकर्ते आक्रमक; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, चौघे ताब्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महाजनादेश यात्रेला (Maha Janadesh Yatra) कालपासून पुन्हा सुरुवात झाली. जळगावजवळ (Jalgaon) ही यात्रा पोहचली असता त्याठिकाणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मनसे आणि भाजप अशा संघर्षाला ठिणगी पडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. यात जळगावातील मनसे विद्यार्थी सेनेचे ते जिल्हाध्यक्ष आणि इतर तिघांचा समावेश आहे.

कोहिनूर मिलप्रकरणी काल (22 ऑगस्ट) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ईडीकडून (ED) कसून चौकशी करण्यात आली. या दोहोंमधील चर्चा तब्बल 8 तासांपेक्षा जास्त काळ चालली. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. भाजप ने मुद्दाम ईडीला राज ठाकरे यांच्यामागे लावले असल्याचा आरोप केला जात आहे. चौकशी संपवून राज ठाकरे बाहेर आल्यानंतर त्यांनी, ‘कितीही चौकशी केली तरी माझ तोंड बंद होणार नाही’ अशा एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली.

(हेही वाचा: Kohinoor Mill Case: कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही; राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर दिली पहिली प्रतिक्रिया)

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 डोळ्यासमोर ठेऊन, भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेचा घाट घातला आहे. सध्या या यात्रेचा दुसरा टप्पा चालू आहे. 13 ते 19 या काळात या यात्रेचा तिसरा टप्पा पार पडेल. त्यावेळी ही यात्रा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांना भेट देईल. आज ही यात्रा जळगाव इथे येणार होती, हीच संधी साधून मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांनी कालच एका निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला होता.