प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

मुंबई पुणे द्रुतगती (Mumbai Pune Expressway) मार्गावर प्रवास सुकर व्हावा आणि वेळ वाचावा यासाठी लवकरच खोपोली ते कुसगाव दरम्यान बोगद्याची बांधणी करण्यात येणार असल्याचे समजत आहे, मात्र या कामासाठी द्रुतगती मार्गावरील 83 हेक्टर जागेत असणारी तब्बल 5,500 झाडे तोडावी लागणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या बांधकामामुळे रस्ता कोंडी कमी होऊन या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांची 25  मिनिटे वाचवली जाऊ शकतील. या उपक्रमाला तूर्तास पर्यावरण खात्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे, मात्र उच्च न्यायलायाच्या याचिकेनुसार, नवनवीन सुविधा उभारताना पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे. I(Delhi Metro प्रकल्पात 'अशी' वाचवली होती १२ हजारहून अधिक झाडे)

काही दिवसांपूर्वी मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो शेडच्या बांधणीसाठी सुमारे 2700 झाडे कापण्याच्या प्रस्तवावरून मोठा गदारोळ झाला होता. पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करत अक्षरशः रान उठवले होते. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालायने मुंबई पुणे द्रुतगती मर्गावरील या प्रकल्पसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करण्याचे सूचित केले होते. यानंतर झाडांची कापणी आणि परिणामी होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फ़े 48 हजार नवीन झाडे लावण्यात येतील असे आश्वासन दिले गेले आहे.

प्राप्त माहितीनुसार 48 हजारांपैकी काही झाडे ही औरंगाबाद जिल्ह्यात तर काही झाडे ही मुंबई पुणे द्रुतगती मार्ग परिसरातच लावण्यात येणार आहेत. नव्याने लावण्यात येणारी झाडे ही वनविभागाच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या जमिनीवरच लावण्यात यावीत तसेच पुढील पाच वर्षांसाठी एमएमआरडीसी तर्फे झाडांची देखभाल करण्यात यावी अशी अट पर्यावरण खात्याने घातली आहे.

दरम्यान, मार्च 2020 पासून खोपोली- कुसगाव मार्गावरील मिसिंग लिंकचे काम सुरु होणार असून याअंतर्गत सर्वात मोठ्या बोगद्याची बांधणी करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला असून त्यानंतर या मार्गावरून प्रति दिवशी सुमारे 80 लाख वाहने प्रवास करू शकतील असा विश्वास आहे.