![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/ANI-Tweet-Pune-24-380x214.jpg)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)ने नुकतीच एका नोटिफिकेशनद्वारा गवंडी, सुतारकाम, फिटर, वेल्डर अशा कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर मध्ये एमएमआरडीए 16726 जणांना कंत्राटी स्वरूपामध्ये काम उपलब्ध करून देणार आहे. इच्छुक उमेदवार mmrda.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्याचं नोटिफिकेशन पाहू शकतो. दरम्यान कोरोना संकटात अनेक कामगार त्यांच्या गावी परत गेले आहेत. अशामध्ये आता एमएमआरडीएच्या प्रकल्पांमध्ये कामं मार्गी लावण्यासाठी तरूणांसाठी रोजगाराची ही नवी संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या या नोटीफिकेशनमध्ये 274 गवंडी, 2678 कारपेंटर्स, 366 फीटर्स स्टील फिक्सिंगसाठी, 3359 फीटर्स बार बेडिंग आणि फिक्सिंगसाठी, 423 जागा वेल्डर्स साठी तर 2167 जागा इलेक्ट्रिशन, वायरमॅन साठी आणि 7459 हे अकुशल कामगार नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी कंत्राटदारांचे फोन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तेथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
एमएमआरडीए मधील नोकर भरतीमधील महत्त्वाची माहिती
अधिकृत संकेतस्थळ: mmrda.maharashtra.gov.in
अधिकृत नोटिफिकेशन: इथे पहा जाहिरात
एकूण जागा: 16726
आवश्यक अनुभव नसणार्या, अर्हता नसणार्या उमेदवारांना कंत्राटदारांकडून महिन्याभराचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान हे कुशल आणि अकुशल अशा दोन्ही कंत्राटी पद्धतीतील कामगारांसाठी उपलब्ध असेल. सोबतच मानधन आणि काही खास सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तात्पुरत्या निवार्याचीदेखील सोय केली जाणार आहे.
दरम्यान 24 मार्च पासून जसा लॉकडाऊन जाहीर झाला तसा अनेक परप्रांतीय, स्थलांतरित मजुरांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक शहरातून काढता पाय घेतला. मात्र आता रूतलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्याचं काम सुरू झालं आहे. मिशन बिगिन अगेनच्या माध्यमातून पुन्हा कामाला राज्यात सुरूवात झाल्याने अनेक बेरोजगारांना अशा कठीण काळात पुन्हा हाताला काम मिळनार आहे.