MLC Election 2024: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीत ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकांपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकीचा धुरळा उडणार आहे. शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकांसाठी 10 जून दिवशी मतदान होणार आहे. यामध्ये ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधर साठी अनिल परब आणि वरूण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघात ज. मो. अभ्यंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांच्या नावाचा विचार सुरू आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस यांच्या टर्म नंतर रिक्त जागेवर अनिल परब किंवा वरूण सरदेसाईंना पाठवण्याचा विचार सुरू आहे. अनिल परब यांचा 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. अनिल परब हे ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. तर वरूण सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाचा एक भाग आणि युवा सेनेचे सचिव आहेत.

विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक आणि 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 मे आहे आणि 10 जूनला मतदान आणि 13 जूनला मतमोजणी होणार आहे. Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्रात लोकसभेनंतर लगेच विधानपरिषद निवडणूक; शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात पुन्हा सामना.

कोकण पदवीधर मतदारसंघात रायगडचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी शिवसेना ठाकरे गटात सोबत असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडून दुसर्‍या नावाचा विचार केला जाऊ शकतो.