उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर दाखल झाला आचारसंहिता भंगाचा गुन्हा
हर्षवर्धन जाधव (Photo Credits-Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातील (Kannad Constituency) आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपल्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत उदगार काढले होते. याबाबत शिव सैनिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. आता जाधवांना त्यांची भाषा चांगलीच भोवली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचारादरम्यान झालेल्या सभेमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर सडाडून टीका केली होती. याबाबत कन्नड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड मतदार संघात आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. प्रचारादरम्यान स्वतः माजी शिव सैनिक असून त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांचा अतिशय नाट्यमयरित्या शिवसेनेत प्रवेश झाला. त्यानंतर शिवसेनेने त्यांना सिल्लोड मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावर भाष्य करताना जाधव यांची जीभ घसरली. त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. (हेही वाचा: आमदारकीचा राजीनामा मंजूर करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची वृत्तपत्रात जाहिरात)

अखेर याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांना तक्रार दिली. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदर्श आचारसंहिता पथक राममहेंद्र डोंगरदिवे यांनी  याबाबत फिर्याद दिली होती. दरम्यान, कन्नड मतदारसंघात शिवसेनेने उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून संतोष कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. महत्वाचे म्हणजे भाजपकडून किशोर पवारही निवडणूक लढवत आहेत त्यामुळ इथली चुरस मोठी औत्सुक्याची असणार आहे.