Dasara Melava 2024: मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले आहेत. यापैकी शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. या दोन्ही मेळाव्यात एकमेंकावर जोरदार टिका झालेली पहायला मिळत आहे. दरम्यान दसरा मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण करत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले. हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईत एक ही नवा रस्ता झाला नाही असे देखील त्यांनी म्हटले. (हेही वाचा - Sushma Andhare on Devendra Fadnavis: फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला; दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंची सरकारवर जोरदार टीका )
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. “अदानींची कामं जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी यांनी केला. या वर्षी महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणूका होणार आहे या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले. "ही लढाई फार महत्वाची आहे. आपल्याला बदल घडवायचा आहे. 2024 च्या विधानसभेची निवडणूक कधी लागणार? याची आपण अनेक महिने वाट पाहत होतो. पण आता तो क्षण जवळ आलेला आहे”, असे आदित्यने म्हटले आहे.
आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार सध्या हजारो निर्णय घेत आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घ्यायला घाई करत आहे. पण मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत अदानीचे सर्व जीआर निघणार नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.