विरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई: विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलीवर दोन अनोळखी इसमांनी झुडपात बलात्कार केला आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मुलीने केल्या वर्णनानुसार त्यातीक एक इसम रिक्षा चालक असल्याचे समजत आहे. काल रात्री साधारण 8 वाजता, विरार पूर्वेकडील जीवदानी रोडवरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या पाठीमागे निर्जन स्थळी ही घटना घडली. यावेळी त्या मुलीचा मित्र तिच्यासोबत होता, मात्र या दोन नराधमांनी त्या मुलाला झाडाला बांधून, जबरदस्तीने मुलीला झुडपात नेऊन हे कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी सोमवारी रात्री आपल्या नातेवाईकांच्या घरी जात होती, दरम्यान रस्त्यात तिला तिचा एक मित्र भेटला. हे दोघेही बोलत जात असताना, तिथे दोन इसम आले. त्यांनी मुलीच्या मित्राला मारहाण केली व त्याला एका झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर आरोपींनी मुलीला बाजूला झुडपात नेऊन, तिच्या मित्राला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून फरार झाले. (हेही वाचा: पोटच्या मुलीवरच वडिलांचा बलात्कार, पीडित मुलीने केली आत्महत्या)

त्यानंतर या मुलीने तिच्या मित्राला सोडवले व ते दोघे घरी आले. त्यानंतर पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या अनोळखी आरोपींविरुद्ध काल रात्री 376 (ड), 323, 506 पोक्सो कायदा 2012 चे कलम 3 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी या दोघांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलीस सर्व रिक्षा चालकांची चौकशी करता आहेत.