मुंबई म्हाडा लॉटरी 2018 ( Photo Credit : PTI)

मुंबईमध्ये घर घेणं हे अनेक सामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा (MHADA Lottery) दरवर्षी घरांची सोडत जाहीर करते. विविध उत्त्पन्न गटात, मुंबई, नवी मुंबई, पुण्यात म्हाडा दरवर्षी घरं उभारते. मात्र गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या घराच्या किंमती देखील चढ्या भावात असल्याने अनेकदा लॉटरी लागूनही सामान्य नागरिक ते विकत घेत नाही. त्यामध्येच दलालांचा हस्तक्षेप असल्याने फसवणूक होत असल्याच्या अनेक घटनादेखील समोर आल्या आहेत. मात्र आता दलालांमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी म्हाडाकडून हेल्पलाईन नंबर (MHADA Vigilance Helpline Number) सुरु करण्यात आला आहे.

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीमध्ये कोणताही मानवीय हस्तक्षेप नसल्याचं म्हाडाने पुन्हा सांगितलं आहे. म्हाडाची घरं मिळवून देतो असं आमिष दाखवून अनेकजण सामान्यांना गंडा घालतात. मात्र म्हाडाची घरांची लॉटरी ही ऑनलाईन पद्धतीची असून ती पारदर्शक पद्धतीने हाताळली जाते. त्यामुळे फसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एजंटपासून दूर राहा. त्याची तक्रार 022 66405445 या हेल्पलाईनवर करा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. जाणून घ्या म्हाडाची घरे मिळवण्याची नक्की काय आहे प्रक्रिया, कोण होऊ शकते या लॉटरीमध्ये सहभागी

म्हाडाच्या घराच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून पुढे येत आहे. मात्र सध्या म्हाडाच्या कोणत्याच घराच्या किंमतीमध्ये बदल होणार नसल्याचेही म्हाडाने सांगितले आहे.