Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

तुम्ही जर मुंबई (Mumbai) शहरात घर घेण्याचे स्वप्न बाळगून असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतल घरांसाठी लवकरच म्हाडा लॉटरी (Mhada Lottery 2023) निघणार आहे. महत्त्वाचे असे की या वेळी म्हाडा 4721 घरांसाठी सोडत काढणार आहे. म्हाडाचे कोकण (Mhada Konkan Lottery) मंडळाद्वारे जाहीर होत असलेल्या या सोडतमध्ये ठाणे, विरार परिसरातील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

म्हाडा कोकण मंडळ 2022 मध्येच सोडत काढणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सोडत लांबली. परिणामी आता ही सोडत निघणार आहे. या सोडतीचे वैशिष्ट्य असे की, ही सोडत संगणकीय प्रणालीनुसार होणार आहे. म्हाडाने लॉटरीसाठी नुकतीच संगणकीय प्रणाली सुरु केली आहे. ही प्रणाली नवी असली तरी, तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम असल्याचे समजते. त्यामुळे म्हाडा कोकण मंडळातील सोडतीच्या घरांची संख्याही वाढल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार 1421 घरांसाठी सोडत निघेल अशी आशा आहे. (हेही वाचा, MHADA Latest News: म्हाडा नोंदणीसाठी नवी संगणकीय प्रणाली, एकदाच नोंदणी करून कोणत्याही मंडळासाठी करता येणार अर्ज)

सोडत कधी होणार जाहीर?

सांगितले जात आहे की, म्हाडा लॉटरीसाठी सोडत निघण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. ठाणे येथील विहंग समूह प्रकल्पातील 20% योजनेतून 256 घरे आणि ठाणे महापालिकेतून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरे अशी एकूण 556 घरांची भर पडल्याने सोडत प्रक्रिया आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की आगामी चार ते पाच दिवसात म्हणजेच साधारण पुढच्या आठवड्यात ही सोडत निघण्याची शक्यता आहे.

काय आहे संगणकीय प्रणाली?

म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळांसाठी वेगवेगळी नोंदणी करावी लागत होती. आता नव्या प्रक्रियेमुळे एकच कायमस्वरुपी नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीद्वारे इतर कोणत्याही मंडळाकडे नोंदणी करता येणार आहे. ज्या व्यक्तीला या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे, तो व्यक्ती सोडत जाहीर झाल्यानंतर या नोंदणीद्वारे लगेचच अर्ज करु शकतो. येत्या गुरुवार म्हणजेच 5 जानेवारीपासून या नोंदणीला सुरुवात होणार असल्याचे वृत्त लोकसत्ता डॉट कॉमने म्हाडातील वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.