मुंबईमध्ये स्वतःचं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मुंबईसारख्या मायानगरीमध्ये दिवसेंदिवस घराचे दर आकाशाला भिडत आहेत. अशावेळेस सामान्यांना परवडणारी घरं मुंबईत उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी सोडत (लॉटरी) काढते. यंदा मुंबईच्या घरातील लॉटरी धनत्रयोदशीला निघणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला अनेकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
मुंबईत यंदा 1 हजार 194 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. तसेच म्हाडाने जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार, घराच्या किंमती सुमारे 25-30% कमी केल्या जाणार आहेत. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सिडकोच्या घरांकडे त्याची किंमत अधिक असल्याने विजेत्यांनी घरं परत केली होती. मात्र ही गोष्ट पुन्हा म्हाडाच्या घरासोबत होऊ नये म्हणून त्याच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
मुंबईत कुठे आहेत घरं ?
अॅंटॉप हिल वडाळा या भागात अत्यल्प उत्पन्न गटासाठी - 278 घरं ( किंमत 30 लाख 71 हजार )
सायन, प्रतिक्षानगर भागात अत्यल्प उत्पन्न गटासाठी - 83 घरं ( किंमत 28 लाख 70 हजार )
मानखुर्दमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी - 114 घरं ( किंमत 27 लाख 26 हजार 757 रूपये)
गव्हाणपाडा मुलुंड भागात अल्प उत्पन्न गटासाठी - 269 घरं ( किंमत 30 लाख 7 हजार 757 रुपये )
सिद्धार्थ नगर गोरेगाव भागात अल्प उत्पन्न गटासाठी - 24 घरं (किंमत 31 लाख 85 हजार रूपये आहे )
परेल, सहकार नगर, घाटकोपर, विक्रोळी या भागातदेखील काही मोजक्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. मात्र त्याची किंमत म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.