Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

मानसिक आजाराने (Mental Illness) ग्रस्त असलेल्या एका 46 वर्षीय मनोरुग्ण (Psychopath) महिलेने आपल्या राहत्या घरी 11 वर्षीय मुलीची हत्या केली. ही घटना मुंबई (Mumbai) येथील बोरिवली (Borivali) पूर्व परिसरात गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024) रात्री उशिरा घडली. मुलीच्या हत्येनंतर महिलेने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच वैद्यकीय उपचार प्राप्त झाल्याने ती बचावली. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सदर महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनोरुग्ण महिलेच्या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिच्यावर काय कारवाई होणार याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

महिला 10 वर्षांपासून ती मानसिक आजाराने त्रस्त

आरोपी महिला तिच्या पती आणि मुलीसोबत राहत होती. पाठिमागील जवळपास 10 वर्षांपासून ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे तिच्यावर वैद्यकीय आणि मानसिक उपचार सुरू होते. तिची नियमीत औषधे सुरु होती. मात्र, अलिकडील काही काळात तिने औषधे घेणे बंद केलेल होते. परिणामी तिचा त्रास वाढला होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री तिने आणि आपल्या मुलीसोबत स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. तिचा नवरा घरामध्येच दुसऱ्या खोलीत होता. तिने कोंडून घेतल्याचे लक्षात येताच त्याने तिला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला. त्याने दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करत असताना तिला समजावण्याचेही प्रयत्न केले. मात्र, महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती आतून कोणताही सकारात्मक प्रतिसाद देत नव्हती. (हेही वाचा, Pune Crime: दारूच्या नशेत पित्याने केली अल्पवयीन मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न)

पोलिसांचा दरवाजा तोडून खोलीत प्रवेश

पत्नीच्या वर्तनामुळे भेदरलेल्या पतीने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा मुलगी आणि महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. महिलेला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. महिलेने स्वत:च्या हाताच्या शिरा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी महिलेची मानसिक स्थिती पाहता तिची ओळख अधिकाऱ्यांनी गोपनीय ठेवली आहे. (हेही वाचा, Wardha Murder: जेवण वाढण्यास उशीर, डोक्यात पाटी घालून बापाने केली मुलीची हत्या)

दरम्यान, सदर घटनेमुळे मानसिक आरोग्य जागरूकतेचे महत्त्व आणि अशा परिस्थितीशी झगडणाऱ्या व्यक्तींना पुरेसा आधार आणि उपचारांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला आहे. मनोरुग्णांवर वेळीच उपचार होणे, कुटुंबानेही त्यांच्या औषधोपचाराकडे योग्य लक्ष देणे महत्त्वाचे असल्याची बाब समाजातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरु केला आहे.