Megablock (Photo Credits:Twitter)

मुंबई लोकल चा हक्काने उशिराने येण्याचा दिवस म्हणजे रविवार. दर रविवार प्रमाणे आज, 1  मार्च रोजी सुद्धा मेगाब्लॉकच्या (Megablock) कामानिमित्त लोकल उशिराने धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) हार्बर रेल्वे (Harbour Railway) वर आज मेगाब्लॉक घेऊन रुळांची, सिग्नलची आणि अन्य तांत्रिक दुरुस्तीची कामे केली जातील. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ठाणे-कल्याण धीमा आणि पनवेल-मानखुर्द दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जंबोब्लॉक घोषित केला आहे. रविवारच्या दिवशी कामावर जाणाऱ्या किंवा सहज फिरायला म्हणून निघणाऱ्या व्यक्तींना या मेगाब्लॉकचा अंतरास सहन करावा लागू शकतो,मात्र नीट वेळापत्रक पाहून तुम्ही तुमचा प्रवास आखलात तर वेळ आणि त्रास दोन्ही वाचवता येईल.म्हणूनच जाणून घ्या.. मुंबई लोकल मेगाब्लॉक वेळापत्रक

मध्य रेल्वे

मध्ये रेल्वेच्या ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 5  या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.तर काही लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत. लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे

पनवेल ते मानखुर्द स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10. 12  ते दुपारी 4.26 पर्यंत मेगाब्लॉक निमित्त कामे पार पडतील. परिणामी, सीएसएमटी/पनवेल-बेलापूर-वाशी /सीएसएमटी लोकल बंद राहणार आहेत. पनवेल-ठाणे-पनवेल आणि नेरुळ ते बेलापूर-खारकोपर लोकल फेऱ्या बंद राहतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता या तिन्ही मार्गांवर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.

मध्य रेल्वे ट्विट

पश्चिम रेल्वे

बोरिवली ते गोरेगाव या स्थानकांच्या दरम्यान, अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3,35 पर्यंत ब्लॉक असणार आहे. परिणामी ब्लॉक कालावधीत, धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर, बोरिवलीसाठी 1, 2,3, 4 या फ्लॅटफॉर्मवरून कोणतीही लोकल उपलब्ध नसेल.

दरम्यान, यापूर्वी शुक्रवारी सुद्धा मध्य रेल्वे कडून मध्यरात्री 4  तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता, आणि त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मुंबई लातूर एक्सप्रेस ट्रेन मध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना लोकल दिरंगाईचा त्रास सहन करावा लागला होता, या गोंधळामुळे अनेक  प्रवाशांना अक्षरशः रुळावर उतरून चालत जावे लागले होते.