आरोग्य विभागात (Health Sector) नोकरी शोधणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जाहीर केले की, राज्य सरकार लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागात येत्या काही महिन्यांत 10,127 पदांसाठी मेगा भरती (Mega Recruitment) करणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
ते म्हणाले, सरकार पुढील वर्षी 1 ते 7 जानेवारी दरम्यान याबाबत अधिसूचना जारी करेल. त्यानंतर 25 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत अर्जांची छाननी केली जाईल. पुढे पात्र उमेदवारांची यादी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान जाहीर केली जाईल. याबाबतची परीक्षा 25 आणि 26 मार्च रोजी होईल आणि निकाल 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 दरम्यान जाहीर केला जाईल.
गेल्या वर्षी सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते. मोठ्या गदारोळानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला काही ठिकाणी पेपर फुटल्याच्या आरोपावरून ही भरती रद्द करावी लागली होती. आता महाजन म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात 13,000 पदांची भरती मार्च 2018 मध्ये (देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात) सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर भरतीकडे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा ही भरती होत आहे. (हेही वाचा: दिवाळीच्या काळात Online Shopping विरोधात व्यापाऱ्यांची मोहीम सुरू, 'व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत नागरिकांना दुकानांमधून वस्तू खरेदी करण्याचे केले आवाहन)
कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, याआधी नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) मधील प्रवेश परीक्षांचे आउटसोर्सिंग करून वर्ग B, C आणि D च्या ग्रेडमधील अंदाजे 75,000 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर आता महाजन यांची ही नव्या भरतीची घोषणा झाली.