Mumbai Local Mega Block: मुंबईत प्रत्येक रविवारी रेल्वेच्या विविध कामांसाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. रेल्वेने आज शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway line)मेगाब्लॉक घेतला आहे. तर, रविवारी मध्य तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान, काही रेल्वेगाड्या उशिराने धावणार असून काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच रेल्वे( Local Train Megablock)प्रवासाचं नियोजन कराव.
रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सर्व ट्रेन डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. अप जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक कालावधीत पनवेल, बेलापूर, वाशी येथून CSMT मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील. कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर देखील रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्याचबरोबर CSMT कडून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील बंद राहतील.
आज शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालण्यात येतील.