Pandharpur Wari 2019: वारकऱ्यांच्या सोयीसाठी Mauli Vitthal Yatra App सादर; वारीतील वाहने, सुविधा यांची माहिती एका क्लिकवर
विठ्ठल (संग्रहित-संपादित प्रतिमा)

अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना झाली. यानंतर आता उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान होईल. पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, शेगाव आणि वखारी आणि अखेर पंढरपूर असा या पालखीचा प्रवास असणार आहे. या वारीमध्ये (Pandharpur Wari 2019) महाराष्ट्रामधील लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. या वारकऱ्यांची यात्रा सुखर पार पडावी म्हणून, ‘माउली-विठ्ठल यात्रा’ या मोबाईल अ‍ॅपची (Mauli Vitthal Yatra App) निर्मिती केली गेली आहे.

‘श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी’च्या पुढाकारातून हे अ‍ॅप सादर केले गेले आहे. वारीमध्ये अनेक दिंड्या सहभागी होतात. या दिंड्यामध्ये हजारो वारकरी पंढरीकडे प्रवास करतात. यामध्ये अनेकदा वारीमध्ये सहभागी झालेली वाहने काही तांत्रिक कारणामुळे बंद पडतात किंवा अपघात घडतात. अशावेळी तातडीची मदत पोहचण्यास या अ‍ॅपची मदत होणार आहे. या अ‍ॅपमध्ये दिड्यांच्या गाड्यांचे नंबर, दिंडीमालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, वाहनचालकाचे नाव व त्याचा मोबाईल नंबर, गाडीचे ठिकाण दाखविणारे जीपीएस लोकेशन अशा सर्व बाबी समाविष्ट असणार आहेत. (हेही वाचा: आळंदी हून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानापूर्वी अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना (Watch Video))

या अ‍ॅपमुळे वाहनचालक, दिंडीमालक, संस्थान कमिटी व पोलिस यंत्रणा यांमध्ये समन्वय साधण्यास मदत होणार आहे. कमिटीमार्फत राबवण्यात येणारे उपक्रम, विविध सुविधा यांची माहितीही या अ‍ॅपमध्ये मिळणार आहे.