छडी लागे छमछम विद्या येई घमघम ही शक्कल डोंबिवली (Dombivli) मध्ये एका शिक्षिकेच्या अंगाशी आली आहे. एका गणिताच्या शिक्षिकेने खाजगी शाळेमध्ये पाचवीच्या दोन इयत्तांमधील विद्यार्थ्यांना बदडल्याचं समोर आलं आहे. प्लॅस्टिक रॉडने त्याने विद्यार्थ्यांना मारल्याचा पालकांचा आरोप आहे. 30 वर्षीय या शिक्षिकेचं नाव निलम भारमाल आहे. सध्या मॅनेजमेंट कडून या शिक्षिकेला बडतर्फ करण्यात आले आहे.
शुक्रवार 13 ऑक्टोबर दिवशी पालकांनी संताप करत शाळेजवळ निषेध केला आहे. S H Jondhale English Medium School या शाळेतील हा प्रकार आहे. पालकांनी शिक्षिकेविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्यामते मुलांना या शिक्षिकेची शिकवण्याची पद्धत समजली नाही त्यामुळे अनेक मुलं गणितं सोडवू शकली नाही. त्यानंतर शिक्षिकेनेही टोकाचं पाऊल उचलत मारहाण केली. पालकांनी ठाकरे गट आणि मनसे कडे या प्रकाराची तक्रार पोहचवली. त्यानंतर पालकांच्या निषेधाच्या वेळेस पोलिसांनाही मध्यस्थी करावी लागली.
विष्णूनगर पोलिस स्टेशन मध्ये पालकांनी केलेल्या तक्रारीवरून शिक्षिकेविरूद्ध कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस इंसपेक्टर मोहन खंदारे यांनी HT ला दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेने सउमारे 80 विद्यार्थ्यांना बदडले आहे. त्यापैकी केवळ 30-40 विद्यार्थी तक्रारीसाठी आणि शिक्षिकेविरूद्ध कारवाईसाठी पुढे आले आहेत. अद्याप शिक्षिकेला अटक झालेली नाही. पोलिस तिचा शोध घेत असून तिचा मोबाईल नंबर देखील स्विच ऑफ आहे. ही शिक्षिका नव्यानेच शाळेत जॉईन झालेली आहे. शाळेचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र शिवाजी जोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी HT ला सांगितले की, या शिक्षिकेचा शाळेत पहिला दिवस होता.
“मुख्याध्यापकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शिक्षकाला काढून टाकले. आमच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असून शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोणताही विरोध झाला नाही, परंतु पालक त्यांच्या तक्रारी घेऊन आले होते, ”असे ते म्हणाले.