Photo credit Instagram

बीएमसीने (BMC) मुंबईकरांच्या सेवेमध्ये अजून एक ऑनलाईन सुविधा आणली आहे. डिजिलॉकर (DigiLocker) वर आता मुंबईकरांना त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट (Marriage Certificate) अर्थात विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन सेव्ह करता येणार आहे. ही सुविधा सध्या 28 जानेवारी 2016 नंतर विवाहबंधनात अडकलेल्यांनाच उपलब्ध होणार आहे. 28 मार्च पर्यंत मुंबईमध्ये ऑनलाईन रजिस्टर झालेले विवाह 3,80,494 आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

विवाहितांसाठी व्हिसा, पासपोर्ट सह अन्य अनेक महत्त्वाच्या सरकारी कागपत्रांसाठी मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असते. बीएमसीने 2010 पासून मॅरेज रजिस्ट्रेशनची सुविधा सुरू केली आहे. तर जानेवारी 2016 पासून ही सुविधा ऑनलाईन माध्यमातूनही खुली केली आहे. आता यामध्ये एक पाऊल पुढे टाकत बीएमसीने मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकर मोबाईल अ‍ॅप वरही उपलब्ध केले आहे. नक्की वाचा: DigiLocker: डिजीलॉकरवर असलेली सर्व कागदपत्रे वैध, डिजीलॉकरचे स्पष्टीकरण.

डिजिलॉकर वर मॅरेज सर्टिफिकेटची सोय खुली करून दिल्याने नागरिकांना त्यांच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊ फिरावं लागणार नाही. ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंतरच युजर्सना हे सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्याहस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान संचालक शरद उघडे, व्यवस्थापक मीनल शेट्ये, डेनिस फर्नांडिस देखील यावेळी उपस्थित होते.