MARD Doctor Strike: राज्यभरात 'मार्ड'चे डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर; मागण्यांची पूर्तता न झाल्याने उचलले पाऊल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Pixabay)

मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी आजपासून (शुक्रवार, 1 ऑक्टोबर) बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. शैक्षणिक शुल्क माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस यांसारख्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने डॉक्टरांनी हे पाऊल उचलले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून डॉक्टरांनी या संपाला सुरुवात केली. मात्र संप काळात आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू राहतील, असे मार्डने स्पष्ट केले आहे.

कोविड-19 संकटामुळे सुमारे दीड वर्ष डॉक्टरांना शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवण्यात आलेला नाही. त्यामुळे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. यात 18 महाविद्यालयातील सुमारे सव्वा पाच हजार डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत मार्डची काल सेंट जॉर्ज रुग्णालयात बैठक झाली. यात डॉक्टरांच्या मनधरणीचे प्रयत्न अपयशी ठरले. बैठकीत कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्याने डॉक्टर संपाच्या निर्णयावर ठाम राहिले. (BMC रुग्णालयातील स्थानिक डॉक्टरांच्या मानधनातून TDS कापू नये)

दरम्यान, सध्या राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना संकट कायम आहे. त्यात इतर आजारांचे रुग्ण, शस्त्रक्रिया यामुळे रुग्णालयावरील ताण वाढत आहे. अशातच निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.