Marathi Language: लवकरच 'मराठी'ला मिळणार 'अभिजात भाषे'चा दर्जा; केंद्राने सुरु केल्या हालचाली, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्र सरकार लवकरच मराठीला (Marathi Language) अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा जाहीर करेल, अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आहे. यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारचा अहवाल स्वीकारला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री किशन रेड्डी यांच्याशी सोमवारी दिल्लीत झालेल्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. देसाई म्हणाले की, त्यांनी रेड्डी यांना या संदर्भात 27 फेब्रुवारी रोजी औपचारिक घोषणा करण्याची विनंती केली आहे.

27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची जयंती असते व हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्व निकष आणि अटींची पूर्तता केल्याला केंद्रीय मंत्र्यांनी दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे, असे देसाई यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्राने नेमलेल्या भाषा तज्ज्ञांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने सर्वानुमते मराठीबाबत शिफारशी केल्या होत्या, परंतु सात वर्षे उलटून गेली तरी अद्याप याबाबत निर्णय झाला नाही. विविध भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने 2004 मध्ये घेतला असला तरी, वारंवार विनंती करूनही मराठी भाषेला अद्याप तो मिळाला नाही. यापूर्वी, राज्याच्या विधानसभेने गेल्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची केंद्राकडे शिफारस करणारा ठराव एकमताने मंजूर केला होता. (हेही वाचा: Marathi Bhasha Din 2022: मराठी भाषा दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, पाहा व्हिडीओ)

दरम्यान, मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली 4 हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.