Maratha Reservation: मराठा आंदोलकाची आत्महत्या; कुटुंबीयास साद, मनोज जरांगे पाटील यांना अवाहन
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन सुरुच आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांमध्ये असलेली अस्वस्थताही कायम आहे. त्यातच आंदोलक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागल्यानेही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) नामक व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन कथीतरित्या आत्महत्या (Suicide) केल्याचे वृत्त आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांना साद घातली आहे तर, मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नका असे अवाहन केले आहे.

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत व्यक्त केली मनातील खदखद

प्रसाद देठे हे मूळचे बार्शी येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे वास्तव्यास होते. पुणे येथील एका खासगी कंपनीत ते काम करत होते. मराठा आरक्षण मिळावे यासाठी ते अग्रही असायचे. दरम्यान, बुधवारी (19 जून) सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीतील मजकूर जसाच्या तसा

जयोस्तु मराठा,

मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजा ताई, भुजबळ साहेब, हाक हाके, शेंडगे, तायवाडे T. P. मुढे गयकवाड, आम्हाला आरक्षण मिळू दया. विनंती आहे तुम्हाला. हात थरतोय म्हणून अक्षर आसं खराब आहे. माझ्या मृत्युला कोणी जवाबदार नाही. मी, स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझ तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालेय. चिऊ मला माफ कर! लेकरांची काळजी घे

धीट रहा. मला माफ करा.

-प्रसाद देठे

Prasad Dethe Suicide Note
Prasad Dethe Suicide Note (Photo Credit - X)

फेसबुकवरही पोस्ट

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनामध्ये प्रसाद देठे हे सक्रीय होते. ते सातत्याने मराठा आंदोलनाबद्दल बोलायचे, सोशल मीडियावरही पोस्ट टाकायचे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेकदा आपली बाजू हिरीरिने मांडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहीलीच. मात्र, त्यासोबतच फेसबुकवरही एक पोस्ट लिहीली आहे. ज्यामध्ये 'जरांगे पाटील जिंदाबाद.. 'लाख मेले तरी चालतील.. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे' आणि मराठा समाजाचा आताचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील हेच आहेत', असेही त्यांनी या पोष्टमध्ये म्हटले आहे.

एका बाजूला मराठा समाजाचे आंदलन सुरु असताना दुसऱ्या बाजूला धनगर समाजाकडूनही आंदोलन सुरु आहे. दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या आरक्षणासाठी मागण्या आहेत. एका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हेसुद्धा उपोषणास बसले आहेत.