Manoj Jarange | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj-Jarange Patil) यांनी सरकारला मुदत दिली होती, मात्र या मुदतीमध्ये सरकारने काही ठोस निर्णय घेतला नाही. आता मराठा आरक्षणाच्या मागणीचा चेहरा असलेले मनोज जरंगे पाटील यांनी ‘मराठा आरक्षणा’च्या मुद्द्यावरून राज्य सरकारशी बोलणी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर राजकीय नेत्यांसोबत मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समुळे निराश झालेले जरंगे पाटील म्हणाले की, या बैठकीमध्ये पुन्हा पोकळ आश्वासने दिली गेली आणि बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. यासह 20 जानेवारीला आझाद मैदानावर एकत्र येणे आता अपरिहार्य असून बेमुदत उपोषण करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढे वाटाघाटी होणार नाहीत. राज्य सरकारने 20 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा नियोजित प्रमाणे दोन कोटी मराठा एकत्र मुंबईकडे मोर्चा काढतील, असे त्यांनी बुधवारी त्यांच्या जालना येथील अंतरवली सराटी या गावी झालेल्या बैठकीत सांगितले. ते म्हणाले की आंदोलकांना मुंबईतील दीड लाख स्वयंसेवकांची मदत मिळेल, तसेच 200 वकील आणि 1,500 डॉक्टर कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीसाठी उपलब्ध असतील. (हेही वाचा: Sanjay Raut On MVA Seat Allocation: महाविकास आघाडी जागावाटप अंतिम टप्प्यात, जागावाटपामध्ये कुठलेही मतभेद नाहीत; संजय राऊत यांची माहिती)

ते म्हणाले, आमच्याकडे ही एकमेव संधी आहे. मी व्हिडिओ कॉन्फरन्स गुप्त ठेवण्यास नकार दिला आणि सर्व काही उघड झाले. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांसाठी आम्ही कुणबी प्रमाणपत्रे मागितली आहेत. मात्र, काही अधिकारी जाणूनबुजून टाळत आहेत. आणि आमच्या मागणीचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. आपल्या तीव्र निषेधाच्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, ते मागे हटणार नाहीत आणि आझाद मैदानावर आंदोलन सुरु होईल. तसेच मुंबईला जाताना पिकांचे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

दरम्यान, 20 जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचे आंदोलन होणार आहे. दोन्ही समाजाच्या समन्वयकांनी आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी, यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबईत आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान आणि बीकेसी वांद्रे मैदानासाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस कोणाला परवानगी देतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.