Maharashtra BJP: भाजपचे चंद्रकांत पाटील सांगतात 'औकातीत राहावं', देवेंद्र फडणवीस म्हणतात 'राज्याने काय माशा मारायच्या काय?'
Chandrakant Patil, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) असो की कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी. राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर नेहमीच टीका करत आलेला आहे. प्रामुख्याने भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रविण दरेकर हे राज्य सरकारवर टीका करताना दिसतात. यात प्रामुख्याने चंद्रकांत पाटील अनेकदा विरोधकांवर (सत्ताधारी) आपल्या वक्तव्यातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. आताही त्यांनी 'अशोक चव्हाण यांनी औकातीत राहावं' असं म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकारकडे बोट दाखवणाऱ्या राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. 'राज्य सरकारने प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणं बंद केले पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?' असे विधान देवेंद्र फडणीस यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावरुन टीका करणाऱ्या भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटले होते की, 'चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणाबाबत नेमही चुकीची माहिती देत असतात. त्यांना मराठा आरक्षणातील काही कळत नाही.' चव्हाण यांच्या या विधानावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवत बसू नये. स्वत:च्या राज्यासाठी काय करता येऊ शकेल ते पाहावे. आपल्या औंकातीत राहावे. आम्हाला आम्ही काय करावे हे शिकवू नये. आम्हाला त्यांची औकात माहिती आहे. (हेही वाचा, कुठून हे नग मिळतात?, जितेंद्र आव्हाडांची उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टिका)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन नौटंकी करत आहे. 102 व्या घटनादुरुस्तीवेळी केंद्राने स्पष्ट केले आहे की राज्यांचे अधिकार कायम राहतील. त्यामुळे केंद्र सरकारने स्पष्ट भूभिका घेत न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करत आपले म्हणने मांडले आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे आभारच मानतो. परंतू, राज्य सरकार उटसूठ केंद्राकडे बोट दाखवत आहे. सर्वच जर केंद्राने करायचे तर मग राज्याने काय माशा मारायच्या काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.