Manoj Jarange Patil | PTI

जालना (Jalna) मध्ये मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज दहाव्या दिवशी देखील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. काल राज्य सरकार कडून जीआर जारी करत निजामकालीन नोंदी असणार्‍यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र दिलं जाईल असं घोषित करण्यात आले होते. यावर आज मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. अद्याप आपल्याकडे जीआर ची प्रत आलेली नाही परंतू त्यांच्या घोषणेतून असं समोर आले आहे की ज्यांच्याकडे निजामकालीन वंशावळीची नोंद आहे त्या दस्ताऐवजावरच कुणबी प्रमाणपत्र मिळणार. मनोज जरांगे सह अनेकांकडे तशी कागदपत्रं नाहीत त्यामुळे या जीआरचा आपल्याला 1% देखील फायदा होणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांची जीआर मध्ये बदलाची मागणी

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जीआर मध्ये एका शब्दाच्या बदलाची सूचना केली आहे. 'वंशावळीच्या दस्ताऐवजा' ऐवजी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे. कालच त्यांनी ही मागणी सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवली आहे. यासाठी लागणारा 1-2 दिवसांचा वेळ घ्या पण बदल करून मराठा समाजाला फायदा करून द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपूर्वीपासून त्यांनी पाणी देखील पिणं बंद केल्याने त्यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे. सध्या आंदोलनस्थळीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आले असून त्याद्वारा काही अ‍ॅन्टिबायोटिक औषधांचे उपचार त्यांच्यावर सुरू आहेत